Monday, November 21, 2011

भूकमरी

मोह धरावा कशाचा
क्षणभंगूर जीवन सारे
दु:ख चिरंतन सोबती
सुख नसे घडीचेही कारे

झोंबती नरडीस जळवा
वदता निषेधाचे नारे
मागता घास आपुलाच
चढती धुरीनांचे पारे

नसे आभाळात ओलावा
गळती अपशकुनी तारे
भिजली चूल पेटविता
विझवती वादळी वारे

तनु तुरुंगात मरणाच्या
गिधाडांचे बसले पहारे
पसरता पदर जीवासाठी
बंद माणुसकीची दारे

मृत्युशय्येवर शांत माता
कंठ चिमण्याचा सोकला रे
आटले सागर विशाल ते
चाखतो अश्रूजल खारे

चिताही नाही नशिबी
साचले कलेवरांचे ढिगारे
सापळ्यावर सारली रेती
भूकमरे झाले किड्यांचे चारे
@ शंकर पाटील - २०/११/२०११

Monday, November 14, 2011

बालदिनानिमित्ता चारोळ्यांचा अनोखा नजराणा


आम्ही असू बालके
कधीही नसलो जरी नीटनेटके
खिशात हवी चोकलेट्स
नाहीतर रहावत नाही एकटे

फ़ुगा नाही मिळाला तर
गालाचा आमच्या फ़ुगा होतो
आई बाबां आणि नातेवाईंकासमोर
आमचा मुद्दाम पचका केला जातो

नाकातून गळणारे टिपूस बघून
समोरचे खोखो हसतात
कधी रुमाल देतात तर
स्वत: च येऊन पुसतात

लहान असताना बाप्पापेक्षा
प्रसाद हवाहवासा वाटतो
कोणताही पोषाख घालून मग
शाळेत फ़ेन्सीड्रेस होतो

दप्तर सांभाळताना
एकाहाताने वोटरबेग सावरतो
अर्ध्यावर आलेली विजार
चाचपडत नीट करतो

शाळेत खेळून कपड्यांची
चांगलीच वाट लागते
आई मग कपडे धुण्यावरून
चार सल्ले देत राहते

जेवण्यासाठी शाळेत
एकट्याने डबा जात नाही
एकमेकांच्या डब्यातले पाहिल्याशिवाय
आपल्या डब्या मजा येत नाही

लहान असताना मिळणारी गिफ़्टस
आता कधीच मिळत नाहीत
लहानपणी कुरवाळणारे
हल्ली मात्र लाड करत नाहीत

अजूनही आठवते ते अल्लड
आणि खट्याळ बालपण
बालवाडीत साजरा केलेला
प्रत्येक मराठी सण

पुन्हा लहान व्हाववेसे वाटते
पाटिवर श्री गणेशाय नम: लिहायचंय
पण पाटी हरवली मुलांची
मग वहिवरंच काम भागवायचंय

पाटिपूजन कालबाह्य झालं
कोण विचारील पाटीला
लेपटोपवरंच सगळे ज्ञान मिळते
कोण जाईल मग शाळेला

बालदिन कसा साजरा व्हायचा
याची कोणालाच जाण नाही
आता मोठा झालास तू म्हणत
आमच्या मनाची कदर नाही

पुन्हा चेहर्‍यावर मुखवटे चढावून
वाढदिवस साजरा करायचाय
पण बाबा केक आणंत नाहीत
मग गोड शिर्‍यावरंच समाधान मानयचंय

लिहायला बरं शिल्लक आहे पण
आजपासून कोलेज चालू शाळा नाही
आम्ही लहान आहोत अजून गप्पा मारा
बाल्यावस्था अजून संपली नाही __

प्रथमेश शिरसाट

Wednesday, November 9, 2011

तिचा अबोल पाउस ..

" काय हे किती चिडचिड करतेस ग ...खरच खूप बोरिंग आहेस तू ..?"
खिडकीतून हातावर पावसाचे थेंब थेंब झेलत झेलत ती मध्येच
तिच्यावर पाण्याचा मारा करत बोलली . ती अजूनच वैतागली
" अग..अग .. काय करतेस ....उगाच मस्ती करू नकोस ..
फटके खाशील .. शी .. सगळे कपडे ओले करशील ...उठ ग तिथून आता
... आणि ..बंद कर ती खिडकी ....किती पसारा मांडून बसलीस
..पेन .. डायरी .. रंग ..पुस्तक सगळे अस्ताव्यस्त ... ऐकतेस ना ..?"
नेहा ने एकवार तिच्याकडे बघितले ... अन मग पुन्हा खिडकीतून पावसाकडे
.. पुन्हा तिच्याकडे पाहिले ..एकटक तिच्याकडे बघतच राहिली ..ती काय म्हणते
याकडे लक्ष च नव्हते तिचे जणू .. तिचा वैतागलेला चेहरा ....नेहाच्या
अश्या पाहण्याने ती पुस्तके आवरता आवरता थांबली " काय .. काय झाल ..
अशी का बघतेस ..? " नेहा उठली अन म्हणाली " ताई .. एक मिनिट इकडे ये ..
तुला काहीतरी सांगायचं " ती म्हणाली ," का असे अचानक एवढे महत्वाचे काय आठवले तुला ?"
" सांगते आधी इकडे तर ये .." ती खिडकीजवळ आली तशी नेहा ने तिला खिडकीजवळ उभी
केली आणि तिचा हात हातात घेऊन खिडकीच्या बाहेर पावसात नेला

....

ती थोडी
अजून वैतागली " नेहा .. काय चाललंय तुझ .. ?".. नेहा म्हणाली " अग अग हात नको काढूस
बघ तर पाउस कसा वाटतो तुला .. बोलतो का काही तुझ्याशी .. बघ .. ऐक तर जरा .."
पावसाच्या थेंबाचे काही तुषार तिच्या चेहर्यावर पडले तश्या तिच्या कपाळाच्या आठ्या
हळूच वितळल्या .. त्या पावसाच्या थेम्बा थेंबाचे स्पर्श तिच्याशी खरच खूप दिवसांनी
भेटल्या सारखे बोलत होते .. तिने अलगद पापण्या बंद केल्या .. तशी एक झुळुकेने पावसाला
अजून तिच्या जवळ नेले .. नेहा म्हणाली " ऐकतेस ना ताई .. बोलतो का ग हा पाऊस?"
नेहाच्या बोलण्याने ती भानावर आली आणि पटकन हात मागे खेचून म्हणाली " नेहा ..
काय आगावूपणा चाललाय तुझा .... ब्लाक चा सीन .. राणी मुखर्जी अंगात आलीय वाटत .."
अस म्हणून तीच्या खोलीत गेली ..नेहा खिडकी बंद करून पाठोपाठ म्हणतच आली
" काय शार्प मेमरी आहे ग तुझी ? अग ऐक ना .. एक मिनिट .."
" नेहा , मला खूप अभ्यास आहे आता ..उद्या खूप महत्वाचे लेक्चर आहे .. प्लीज मला त्रास नको देवूस "
नेहा म्हाणाली .." हम्म लेक्चर्स.. ताई .. थोडा वेळ .ग मला बोलायचे आहे तुझ्याशी .. नंतर कर ना
तुझा अभ्यास .. थोडा वेळ अगदी थोडा वेळ .."

ती शेवटी हरून म्हणाली " हम्म बोला .."
" ताई .. तुझ्या बाबतीत कधी असं झालंय का ग ..मला वाटत जणू पाउस माझ्याशी बोलतो
...त्य्च्यात भिजलेली ती कौलारू घर.. पानापानावरून अलगद निथळनारे थेंब ..
अन हि चाफ्याची फुले .. किती बोलकी आहेत " नेहाने हळूच ओंजळीत घेतलेली
ती चाफ्याची फुले .ओली ओली ..हळुवार गंधाची .. नेहाच्या हातात ती फुले पाहून
तिच्या पापण्या थरथरल्या ..ती नेहाकडे काही वेळ बघत राहिली प्रश्नार्थक नजरेने
नेहा ने हळूच त्या फुलांचा एक गंध श्वासात भरला आणि म्हणाली " ताई ,.. कधीतरी
झेल ग पाउस हातांवर .. येऊ दे झुळूक अंगावर .. कुणीतरी नकळत हातात ठेवलेल्या
चाफ्याची काही फुले आयुष्यभर सुगंध होऊन दरवळत राहतात ना .. क्षण होऊन
सुगंधी क्षण .. .मग आयुष्याच्या हि प्रेमात पडतो आपण .. अन बोलायला लागतात
आपल्याशी रोजची पहाट.. .. रोजच संध्या .. अन सगळ्यात जास्त बोलका होतो हा
पाउस .. .हो ना ..?" ती अजून हि त्या चाफ्याच्या फुला मध्येच होती .. नेहाच्या प्रश्नाने
तिने हळुवार तिच्या कडे पाहिले अन म्हणाली " वेडी आहेस ? कविता छान लिहिशील ..
झाले सांगून .. जा आता .." नेहा थोडावेळ तिच्याकडे बघत राहिली अन म्हणाली " ताई
खरच पाउस तुझ्याशी बोलत नाही ..? " ती म्हणाली " हो रिमझिम कधी टीप टीप .. कधी
धोधो .. पण मला त्याचे शब्द कळत नाही ." नेहा वैतागली " काय ग तू पण जा
मला वाटत तुझा पाउस अबोलच आहे .. अरसिकच आहेस तू "

ती म्हणाली " हो असेल .. पण तुला पावसाशी बोलताना छान वाटतं नेहा ... मला तर
दिसतो तो चिखल .. गाळणार्या घरा मुळे जागो जागी भांडी लाऊन दमणारी लोक ..
पावसात छत नसलेली कुठेतरी आडोश्याला कुडकुडत असणारी लाचारी गरिबी ...
अति पावसामुळे कुठे बंद झालेल्या कामांमुळे अडगळीत गोठलेल्या सुन्न नजरा
.. आ वासून उभी असलेली विषमता ...तुंबलेल्या गटारीत वाहून गाळात अडकलेल्या
चिमुकल्या कागदी स्वप्नांच्या होड्या ....तो आंब्याच्या केतकीच्या वनात नाचणारा मोर
हल्ली अदृश्य झालाय माझ्या पावसाच्या शब्दांसारखा .. माझा पाऊस अबोलच आहे "
नेहा पुन्हा त्याच ढंगात एकटक तिच्याकडे बघत राहिली .. म्हणाली " हात पुढे कर .."
तिने न बोलता हात पुढे केले . नेहाने हळूच ती चाफ्याची फुले तिच्या हातात ठेवली
" ताई ,.. तुझ्या अबोल पावसाला लवकर शब्द मिळोत .. आणि तुझ्याशी हि
हा पाऊस बोलायला लागो .. माझ्या पावसासारखा .. शुभरात्री "
नेहा निघून गेली .. तिच्या ओठांवर किंचित हास्याची लकेर उमटली ..बिच्चारी नेहा
या अविर्भावात पण दुसर्याच क्षणी तिच्या हातातली चाफ्याची फुले .. तिच्या पापण्या
पुन्हा थरथरल्या "कुणीतरी नकळत हातात ठेवलेल्या
चाफ्याची काही फुले आयुष्यभर सुगंध होऊन दरवळत राहतात ना .. क्षण होऊन
सुगंधी क्षण .. .मग आयुष्याच्या हि प्रेमात पडतो आपण ." .. नेहाचे शब्द ..

ती पुन्हा
त्या फुलांच्या ओल्या गंधात हरवली .. तिने हळूच ती फुले हुंगली ..त्यांचा गंध
श्वासात भरला ..त्या फुलाना टेबलावर ठेऊन ..तिने बाल्कनीचा दरवाजा
उघडला ... बाहेर पाउस अखंड कोसळत होता .. तिने हात पुढे केले .पावसाचे थेंब झेलताना
थंड खोडकर झुळूकेसार शी तुषार तिच्या चेहर्यावर आले .. तिने पापण्या बंद केल्या ..
" कां ... ग .... खूप दिवसांनी तुझ्या हाताना चाफ्याचा गंध आहे आज ...आजही तशीच चिंब
होणार आहेस का माझ्यात ...?" तिने पापण्या उघडल्या दचकून पहिले इकडे तिकडे ...
खूप दिवसांनी तिच्याशी पाउस बोलत होता ... तिचा अबोल पाउस ..बोलका झाला होता
आज खूप दिवसांनी ... त्या चाफ्याच्या फुलांनी ... !!!

*अंतर्नाद*

सौंदर्य

सकाळपासून च ती आरश्यात 
स्वताला पाहत होती 
एकेक साज एकेक शृंगार 
किती वेळ स्वतःला सजवत होती 

शामल हिरवी साडी 
त्याच्या आवडत्या रंगाची 
केश रचनेत माळली होती 
फुले धुंध मोगर्याची 

रूप तीच खुलुल होत 
सगळेच तिला म्हणत होते 
तीच मन मात्र 
त्याच्या नजरेला शोधात होते 

बघाव त्यांना एकदा तरी 
म्हणून निमित्ताने गेली समोरून 
तो असा अरसिक साजन 
गुंग होता कशात एकदाच पाहिलं दुरून 

आता ती थकली होती 
पार्टी हि आटोपली होती
तिच्या मनासारखं सार 
तिच्या मनातच राहील होत 

उतरवून साज शृंगार 
न्हाऊन रंग सारे पुसले 
वार्यावर बहुरू भरू लागले 
केस तिचे ओले ओले 

स्वतःशीच हसत होती 
बरीच हसण्याची निमित्त होती 
मागे वळून पाहिलं तर 
त्याची नजर तिच्यावर खिळलेली होती 

नाही कुठले कृत्रिम रंग 
ना जड जड साज शृंगार 
किती सुंदर दिसतेस अशीही 
त्याची नजर बोलत होती 

त्याच्या नजरेतले सौंदर्य 
किती साध सुध होत 
विसावत त्याच्या बाहूत म्हटले स्वतःशीच 
या साठीच तर सगळे निमित्त होत ,,,!!!
 
*अंतर्नाद*

Monday, November 7, 2011

मी आणि माझा शत्रू पक्ष... पु. ल . देशपांडे..MP3

मंथन च्या चारोळ्या.. भाग २







Add caption



Add caption

तुझ्या हातात हात देणं

तुझ्या हातात हात देणं
हे सोप्पं नव्हतं मला
परिणामाची चिंता न करता
विश्वासाने तरीही मी हात पुढे केला !

मनापासून प्रेम केलं तुझ्यावर म्हणून
घरापासुनही पोरकं केलं स्वतःला
माझ पूर्ण अस्तित्वच
अर्पण केलं मी तुला !!

पण आज तो हातही
तू हिरावून घेतलास
तेव्हा निर्णय घ्यायला लावून
आज अचानक पलटलास !!!

असा कसा माझ्या भावनाचा
बाजार तू मांडलास
तुझ्यासोबत मांडलेला डाव
अर्ध्यावरच उधलावलास !!!

आता मी कुठे जाऊ ???
नाती असताना अनाथ म्हणून राहू
का रे सगळ्याच नात्यांपासून
पोरकं केलास मला ???

का रे सगळ्याच नात्यांपासून
पोरकं केलास मला ???

रेशु

Sunday, November 6, 2011

प्रदीप काकांच्या चारोळ्या भाग २

सुंदर स्त्री दिसली की नकळत वळतात नजरा...
रेखीव पुष्ट देहयष्टी पाहुनी तुप्त होते आपुले मन...
एक क्षण वाटत वाईट असं सौंदर्य नाही आपलं...
क्षणात होता नजरा नजर लाजेने चूर होते मन...
-- प्रदीप केळकर...

सौंदर्याची किंमत ना नाही मोजावी लागत सुंदर स्त्रियांना...
जपावी तिने नित्य साधी रहाणी अन उच्च विचारसरणी...
लाघवी व्यक्तिमत्व मिठास वाणी शुद्ध आचरण ठेवी निर्मल...
सुंदर स्त्रीकडे पाहता दिसावी आपुलीच माय तिच्या ठिकाणी...
-- प्रदीप केळकर...

वागण माझं खुपतंय तुला हे कळतंय मला...
तुझ्या धारदार शब्दांनी घायाळ केलंस मन...
आला राग विचार नाही केलास तुझ्या चुकीचा...
धरला मी अबोला झालो स्तब्ध शांत झालं मन...
-- प्रदीप केळकर...

मनातील काही भावना नाही सांगता येत शब्दात...
नाही शब्द फुलत ओठी नाही येत प्रितीच्या भावना...
नयन बोलती चेहराही खुलतो ओठ हसती आनंदानी...
कळत नकळत झालेला तुझा स्पर्श सांगे प्रीती भावना...
-- प्रदीप केळकर....

स्वत:साठी सगळेच असतात जगत...
एक दिनी जगून पहा फक्त दुस-यासाठी...
येईल समजून दु:ख त्यातून शोधा सुख...
जाणा सुख दु:खांचा खेळ आपल्यासाठी...
-- प्रदीप केळकर...

कठोर शब्द तुझे मनाला घायाळ करुनी गेले...
झालेली चूक आली लक्षात वाटलं खूप वाईट...
चूक येईलही सुधारता मनाला जखमेचे काय...
जखमेचा व्रण मनाला चिकटून रहाणार घट्ट...
-- प्रदीप केळकर...

तुझ्यावर केलं मी मनापासून प्रेम...
जिभेवरील शब्द ओठीच का थबकले...
नाही व्यक्त करू शकलो मी प्रेमभावना...
तू संधी देऊनही माझे प्रेम अबोल जाहले...
-- प्रदीप केळकर...

राहणे शक्य नाही ईश्वरास आपुल्या भक्तांचे घरी...
शोधिला उपाय ईश्वराने रुपात आईच्या राहिला...
आई आपणासी परम पूज्य लीन व्हावे चरणी...
भाग्य थोर म्हणुनी सहवास आईचा लाभला...
-- प्रदीप केळकर...

क्षण ते प्रितीचे लागतात विसरावे...
एकतर्फी प्रीतिला नसतो अर्थ काही...
येईल आठवण जेव्हा ठेवावे शांत मन...
प्रितीशब्द गुंफण्याचे तिच्या नशिबी नाही...
-- प्रदीप केळकर...

अर्थपूर्ण शब्द तुझे ओठी फुलतात सहजतेने...
कागदावर उमलतात सुंदर कवितांच्या रुपात...
दुखितांना देतात आनंद हसवितात पोट भरून...
आनंदी जीवनाचे रहस्य बहरते तुझ्या शब्दात...
-- प्रदीप केळकर....

हातावरील रेषा आपल्या सांगतील का भविष्य...
पाहिल्या असंख्य रेषा गोंधळ होईल मनाचा...
शहाण्यांनी लागू नये मागे हातावरील रेषांच्या...
उभ्या आडव्या रेषा दावती मार्ग आपुल्या दु:खाचा...
-- प्रदीप केळकर...

पैसे खाणारे अनेक आहेत आपल्यात...
पैसा देई मौज मज्जा धुंद करी मनाला...
अन्न ही खाणारे आहेत की आपल्यात...
अन्न देते आरोग्य शक्ती समाधान मनाला...
-- प्रदीप केळकर...

आपल्या हातावरील असंख्य रेषा...
घडवीत नाहीत आपलं नशीब कधीही...
आपलं नशीब घडतं बुद्धी अन कष्टानी...
प्रामाणिक कष्ट देती समाधान कधीही...
-- प्रदीप केळकर...

मागे वळून कधीही पाहू नका...
आत्मविश्वासाने पुढे जात रहा...
येणारी संधी कधी सोडू नका ...
मराठीचा अभिमान ठेऊन रहा...
-- प्रदीप केळकर...

आपली उचली जीभ लावली टाळ्याला...
अपशब्द बोलून दुखवू नये कोणालाही...
गोड बोलून आपणास जग जिंकता येत...
किमया हि शब्दांची फुलवावी बहरावीही...
-- प्रदीप केळकर...

Tuesday, November 1, 2011

मंथन च्या चारोळ्या भाग १

विरहाच्या वाटेवर...
हर एक अडखळलेला...
प्रेम करुन पुन्हा...
त्याच्याच प्रेमात पडलेला...
©*मंथन*™.. ३१/१०/२०११ रात्रौ ०१.२७

तुझी छेड काढताना....
तु नाक मुरडत जातेस..
नाक मुरडत जाता जाता...
एकदा मागे वळून पाह्तेस..
©*मंथन*™.. ३१/१०/२०११ रात्रौ १२.५४

बागडताना तुझ्या सवे...
हा वारा ही बागडायचा...
तु बोलायला लागलीस...
तो कोकीळ मंजूळ गानी गायचा..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ ११.५८

तुला हसताना पाहून
रोम रोम माझे हसु लागले...
मांडीवर तू डोके ठेवताना...
क्षण ते बहरून आले..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ ११.२३

डोळ्यात तुझ्या शोधत असतो..
माझ्या हरवलेल्या स्वप्नांना...
पापणी मागे लपविलेल्या...
तुझ्या त्या आसवांना...
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ ११.१६

डोळ्यात तुझ्या पाहताना...
माझे प्रतिबिंब दिसले....
वेडे हे मन माझे..
तेव्हा तेथेच फ़सले...
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ १०.५०

मला हसायला आवडते...
तु सोबत असलीस की..
अन माझे हसू आवरत नाही...
तु रुसुन बसलीस की..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११ रात्रौ ११.०४

हसतेस तू खुळते एक कळी...
हसतेस तु हसते माझे नशीब...
हसतेस तू वाहतो गार गार वारा...
हसतेस तु तेव्हा येतेस माझ्या करीब..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११

माझ्याकडे रोखून पाहताना...
डोळे तुझे एकटक पाहायचे...
तुझ्या डोळ्यात पाहताना...
तुला पाहायचेच राहायचे..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११

मागे वळून पाहताना...
मस्त गोड हसायचीस...
त्या हसण्यातच मला..
पुढच्या भेटीसाठी आतुर करायचीस..
©*मंथन*™.. ३०/१०/२०११