" काय हे किती चिडचिड करतेस ग ...खरच खूप बोरिंग आहेस तू ..?"
खिडकीतून हातावर पावसाचे थेंब थेंब झेलत झेलत ती मध्येच
तिच्यावर पाण्याचा मारा करत बोलली . ती अजूनच वैतागली
" अग..अग .. काय करतेस ....उगाच मस्ती करू नकोस ..
फटके खाशील .. शी .. सगळे कपडे ओले करशील ...उठ ग तिथून आता
... आणि ..बंद कर ती खिडकी ....किती पसारा मांडून बसलीस
..पेन .. डायरी .. रंग ..पुस्तक सगळे अस्ताव्यस्त ... ऐकतेस ना ..?"
नेहा ने एकवार तिच्याकडे बघितले ... अन मग पुन्हा खिडकीतून पावसाकडे
.. पुन्हा तिच्याकडे पाहिले ..एकटक तिच्याकडे बघतच राहिली ..ती काय म्हणते
याकडे लक्ष च नव्हते तिचे जणू .. तिचा वैतागलेला चेहरा ....नेहाच्या
अश्या पाहण्याने ती पुस्तके आवरता आवरता थांबली " काय .. काय झाल ..
अशी का बघतेस ..? " नेहा उठली अन म्हणाली " ताई .. एक मिनिट इकडे ये ..
तुला काहीतरी सांगायचं " ती म्हणाली ," का असे अचानक एवढे महत्वाचे काय आठवले तुला ?"
" सांगते आधी इकडे तर ये .." ती खिडकीजवळ आली तशी नेहा ने तिला खिडकीजवळ उभी
केली आणि तिचा हात हातात घेऊन खिडकीच्या बाहेर पावसात नेला
ती थोडी
अजून वैतागली " नेहा .. काय चाललंय तुझ .. ?".. नेहा म्हणाली " अग अग हात नको काढूस
बघ तर पाउस कसा वाटतो तुला .. बोलतो का काही तुझ्याशी .. बघ .. ऐक तर जरा .."
पावसाच्या थेंबाचे काही तुषार तिच्या चेहर्यावर पडले तश्या तिच्या कपाळाच्या आठ्या
हळूच वितळल्या .. त्या पावसाच्या थेम्बा थेंबाचे स्पर्श तिच्याशी खरच खूप दिवसांनी
भेटल्या सारखे बोलत होते .. तिने अलगद पापण्या बंद केल्या .. तशी एक झुळुकेने पावसाला
अजून तिच्या जवळ नेले .. नेहा म्हणाली " ऐकतेस ना ताई .. बोलतो का ग हा पाऊस?"
नेहाच्या बोलण्याने ती भानावर आली आणि पटकन हात मागे खेचून म्हणाली " नेहा ..
काय आगावूपणा चाललाय तुझा .... ब्लाक चा सीन .. राणी मुखर्जी अंगात आलीय वाटत .."
अस म्हणून तीच्या खोलीत गेली ..नेहा खिडकी बंद करून पाठोपाठ म्हणतच आली
" काय शार्प मेमरी आहे ग तुझी ? अग ऐक ना .. एक मिनिट .."
" नेहा , मला खूप अभ्यास आहे आता ..उद्या खूप महत्वाचे लेक्चर आहे .. प्लीज मला त्रास नको देवूस "
नेहा म्हाणाली .." हम्म लेक्चर्स.. ताई .. थोडा वेळ .ग मला बोलायचे आहे तुझ्याशी .. नंतर कर ना
तुझा अभ्यास .. थोडा वेळ अगदी थोडा वेळ .."
ती शेवटी हरून म्हणाली " हम्म बोला .."
" ताई .. तुझ्या बाबतीत कधी असं झालंय का ग ..मला वाटत जणू पाउस माझ्याशी बोलतो
...त्य्च्यात भिजलेली ती कौलारू घर.. पानापानावरून अलगद निथळनारे थेंब ..
अन हि चाफ्याची फुले .. किती बोलकी आहेत " नेहाने हळूच ओंजळीत घेतलेली
ती चाफ्याची फुले .ओली ओली ..हळुवार गंधाची .. नेहाच्या हातात ती फुले पाहून
तिच्या पापण्या थरथरल्या ..ती नेहाकडे काही वेळ बघत राहिली प्रश्नार्थक नजरेने
नेहा ने हळूच त्या फुलांचा एक गंध श्वासात भरला आणि म्हणाली " ताई ,.. कधीतरी
झेल ग पाउस हातांवर .. येऊ दे झुळूक अंगावर .. कुणीतरी नकळत हातात ठेवलेल्या
चाफ्याची काही फुले आयुष्यभर सुगंध होऊन दरवळत राहतात ना .. क्षण होऊन
सुगंधी क्षण .. .मग आयुष्याच्या हि प्रेमात पडतो आपण .. अन बोलायला लागतात
आपल्याशी रोजची पहाट.. .. रोजच संध्या .. अन सगळ्यात जास्त बोलका होतो हा
पाउस .. .हो ना ..?" ती अजून हि त्या चाफ्याच्या फुला मध्येच होती .. नेहाच्या प्रश्नाने
तिने हळुवार तिच्या कडे पाहिले अन म्हणाली " वेडी आहेस ? कविता छान लिहिशील ..
झाले सांगून .. जा आता .." नेहा थोडावेळ तिच्याकडे बघत राहिली अन म्हणाली " ताई
खरच पाउस तुझ्याशी बोलत नाही ..? " ती म्हणाली " हो रिमझिम कधी टीप टीप .. कधी
धोधो .. पण मला त्याचे शब्द कळत नाही ." नेहा वैतागली " काय ग तू पण जा
मला वाटत तुझा पाउस अबोलच आहे .. अरसिकच आहेस तू "
ती म्हणाली " हो असेल .. पण तुला पावसाशी बोलताना छान वाटतं नेहा ... मला तर
दिसतो तो चिखल .. गाळणार्या घरा मुळे जागो जागी भांडी लाऊन दमणारी लोक ..
पावसात छत नसलेली कुठेतरी आडोश्याला कुडकुडत असणारी लाचारी गरिबी ...
अति पावसामुळे कुठे बंद झालेल्या कामांमुळे अडगळीत गोठलेल्या सुन्न नजरा
.. आ वासून उभी असलेली विषमता ...तुंबलेल्या गटारीत वाहून गाळात अडकलेल्या
चिमुकल्या कागदी स्वप्नांच्या होड्या ....तो आंब्याच्या केतकीच्या वनात नाचणारा मोर
हल्ली अदृश्य झालाय माझ्या पावसाच्या शब्दांसारखा .. माझा पाऊस अबोलच आहे "
नेहा पुन्हा त्याच ढंगात एकटक तिच्याकडे बघत राहिली .. म्हणाली " हात पुढे कर .."
तिने न बोलता हात पुढे केले . नेहाने हळूच ती चाफ्याची फुले तिच्या हातात ठेवली
" ताई ,.. तुझ्या अबोल पावसाला लवकर शब्द मिळोत .. आणि तुझ्याशी हि
हा पाऊस बोलायला लागो .. माझ्या पावसासारखा .. शुभरात्री "
नेहा निघून गेली .. तिच्या ओठांवर किंचित हास्याची लकेर उमटली ..बिच्चारी नेहा
या अविर्भावात पण दुसर्याच क्षणी तिच्या हातातली चाफ्याची फुले .. तिच्या पापण्या
पुन्हा थरथरल्या "कुणीतरी नकळत हातात ठेवलेल्या
चाफ्याची काही फुले आयुष्यभर सुगंध होऊन दरवळत राहतात ना .. क्षण होऊन
सुगंधी क्षण .. .मग आयुष्याच्या हि प्रेमात पडतो आपण ." .. नेहाचे शब्द ..
ती पुन्हा
त्या फुलांच्या ओल्या गंधात हरवली .. तिने हळूच ती फुले हुंगली ..त्यांचा गंध
श्वासात भरला ..त्या फुलाना टेबलावर ठेऊन ..तिने बाल्कनीचा दरवाजा
उघडला ... बाहेर पाउस अखंड कोसळत होता .. तिने हात पुढे केले .पावसाचे थेंब झेलताना
थंड खोडकर झुळूकेसार शी तुषार तिच्या चेहर्यावर आले .. तिने पापण्या बंद केल्या ..
" कां ... ग .... खूप दिवसांनी तुझ्या हाताना चाफ्याचा गंध आहे आज ...आजही तशीच चिंब
होणार आहेस का माझ्यात ...?" तिने पापण्या उघडल्या दचकून पहिले इकडे तिकडे ...
खूप दिवसांनी तिच्याशी पाउस बोलत होता ... तिचा अबोल पाउस ..बोलका झाला होता
आज खूप दिवसांनी ... त्या चाफ्याच्या फुलांनी ... !!!
*अंतर्नाद*
0 comments:
Post a Comment